logo

भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा सोहळा संपन्न

अकोले -: तालुक्याच्या शेंडी बीटातील भंडारदरा जिल्हा परिषद शाळेत नुकताच विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा व सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदमयी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील बाल कलाकारांनी सादर केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, प्रबोधनात्मक नाटीका, महाराष्ट्राची लोकधारा, राष्ट्रभक्तीपर गाणी, आदिवासी संस्कृतीची ओळख, लावणी, कोळी गीते तसेच मराठी, हिंदी गाण्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या बाल कलाकारांवर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. किरण लहामटे, अगस्ती साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा. श्रीमती सुनिताताई भांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी मा. सिताराम धांडे, कातळापुर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. पुनाजी धांडे, सरपंच मा.अनिताताई खाडे, उपसरपंच मा. गंगाराम इदे, माजी सरपंच मा. पांडुरंग खाडे, गोगा बुळे, आनंदा खाडे, व्यवस्थापनचे सुरेश खाडे व दिनकर खाडे उपस्थित होते.‌ शेंडी परिसरातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी हा सुंदर कार्यक्रम बघण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले म्हणून ग्रामस्थांकडून शाळेतील शिक्षक धोंडु मुंढे, भाऊ गंभीरे, भाऊसाहेब भांगरे, पांडुरंग बारामते व मोहन कुसळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गॅदरिंगच्या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल टाकळी शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्रीनिवास पोतदार यांचादेखील संयोजन समितीकडून विशेष सत्कार करण्यात आला. भंडारदरा पेसा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या स्तुत्य उपक्रमासाठी अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी मा. अभयकुमार वाव्हळ व शालेय पोषण आहार अधिक्षक मा. अरविंद कुमावत यांनी शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.

0
0 views